NMC Logo
NMC

History

  • आपलं नाशिक
  • मंदिरे
  • नाशिक जवळील इतर प्रेक्षणिय स्थळे
  • नाशिक मधील प्रसिध्द व्यक्तीमत्व
  • पर्यटकांसाठी इतर सोयी-सुविधांची माहिती
  • जीवनगंगा

आपलं नाशिक

प्राचीन काळात पद्यपुर, जनस्थान अशी नावं धारण करणारं हे शहर मोगल काळात गुलशनाबाद होतं. नंतर ते नासिक झालं आणि आता नाशिक, पद्यपुर म्हणजे कमळांचं शहर आणि गुलशनाबाद म्हणज‌ए फ़ुलाचं शहर. या दोन नावांमध्ये कमालीचे साम्य आहे. लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक म्हणजे नासिका या ठिकाणी कापलं म्हणून नासिक हे नांव असावं. दक्षिण गंगा गोदावरिच्या काठी वसलेलं, वाढलेलं, सिंहस्थ कुंभमेळा भरविण्याचा मान असलेलं नाशिक शहर पुराण काळात मुळं रुजवलेलं. इतिहासाच्या अवकाशात फ़ांद्या फ़ैलावलेल्या. आधुनिकतेच्या मोहराचे धुमार शाखेशाखेवर लगडलेले. प्राचीन तीर्थस्थळ ते आधुनिक सांस्कृतिक- औद्योगिक नगरी ही आहे नाशिक शहराची वाटचाल.

गोदावरी नदिचे महत्व व पावित्र्य

भारतात गंगा नदीस धार्मिक महत्व आहे तसेच महत्व गोदावरी नदिसही आहे. गोदावरी नदीस "गंगा" असेही म्हटले जातेच. नाशिकमधील गोदावरी नदीस पवित्र का मानले जाते? तर गोदावरी नदी नाशिक शहरातच दक्षिणेकडे पुर्ण वळण घेते म्हणून तिला पावित्र्य प्राप्त झाले आहे. पुराणातील मतांनुसार, उत्तरेस वळते तेव्हा गंगा पवित्र होते, पश्चिमेस वळते तेव्हा यमुना पवित्र होते, पुर्वेस वळते तेव्हा पायोशनी नदी पवित्र होते. दक्षिणेस वळते तेव्हा गोदावरीही पवित्र होते. याखेरीज भूगर्भातील सात जलप्रवाह गोदावरीस येथेच मिळतात. त्याची नावे अशी- अरूणा, वरुणा, सरस्वती, श्रध्दाख मेधा, सावित्री व गायत्री, गुरु सिंह राशीला येतो त्या काळात गंगा, साडेतीन कोटी तीर्थे व तेहेतीस कोटी देव गोदावरीच्या भेटीस येतात व स्वतःला पुन्हा पवित्र करुन घे‌ऊन जातात. सिंहस्थ म्हणजे गोदावरी नदीचा बारा वर्षानी येणार‌आ वाढदिवस. याबद्दल कथा अशी- मांधाता राजाच्या काळात शंकर, गौतम ऋषींवर प्रसन्न झाले. त्यांनी आपल्या जटेच्या एक भाग गौतमांना दिला. तो गौतमांनी कुर्मावतार काळात व सिंह राशीत गुरु असतांना माघ शुध्द दशमीस ब्रम्हगिरी पर्वतावर स्थापन केला व त्यातुन गोदावरी नदीचा उगम झाला. म्हणून सिंहस्थ म्हणजे गोदावरीचा वाढदिवस.

रामकुंड

नाशिकमध्ये आल्याबरोबर बहुतेक भाविक सर्वात आधी रामकुंडावर येतात. त्यांना रामकुंडात पुण्यस्नान करण्याची आस असते. कारण रामकुंड पवित्र स्थान मानले जाते. या रामकुंडाला लागुन सीताकुंडसुध्दा आहे. अनेक भाविकांना याची माहीती नसते. रामकुंड आता जरी बांधलेल्या स्वरुपात दिसत असले तरी रामायण काळात गोदावरी नदीच्या प्रवाहाचाच तो एक भाग होता. राम-सिता-लक्ष्मण तपोवनातील आपल्या पर्णकुटीकडून या ठिकाणी स्नानासाठी यायचे, म्हणून पुढील काळात रामकुंडाला महत्व मिळाले. रामकुंडात जिवंत पाण्याचे झरे आहेत. कदाचित त्यामुळेच येथे मृतांच्या अस्थींचे विलीनीकरण सहज होते. हिंदू धर्मशास्त्रात मोक्षप्राप्तीसाठी ही महत्वाची बाब मानली जाते. रामकुंडाचे एकुण क्षेत्रफ़ळ ३३० चौ.फ़ूट आहे. बांधणी भक्कम, दगडी आहे. रामकुंडाची बांधणी पेशवे काळापुर्वी म्हणजे इ.स. १६९६ साली झाली व तेव्हाचे एक सरदार चित्रराव खटावकर यांनी ती केली आहे. पेशवे काळात या रामकुंडाची चांगली दुरुस्ती केली गेली व अलीकडेच इ.स. २००५ मध्येही त्यात सुधारणा करण्यात आली आहे.

कपालेश्वर मंदिर

रामकुंडात स्नान केल्यानंतर, कपालेश्वर मंदिरात जावं, रामकुंडासमोरच असलेले हे मंदिर, जागृत देवस्थान मानले जाते. श्रीविष्णुने स्वहस्ते येथील शिवपिंड स्थापन केलेली असल्याने बारा ज्योर्तिलिंगांचे पुण्य श्री कपालेश्वर दर्शनाने होते. गाभार्‍यातील शिवपिंड प्राचीन असून, शिवपिंडीसमोर नंदीमूर्ती मात्र नाही. कारण पुराणकथेनुसार श्री शंकरांच्या माथी ब्रम्हहत्येचे पातक होते. नंदीच्या बोलण्यातून श्री शंकरांना समजले की, रामकुंडामधील अरुणासंगम तीर्थात स्नान केल्यास हे पातक नाहीसे हो‌ईल. त्याप्रमाणे श्री शंकरांनी अरुणासंगम केल्याने येथे नंदीमुर्ती नाही. इ.स.१७२८ मध्ये कोळी जमातीने या मंदिराची बांधणी केली. इ.स. १७६३ मध्ये जगजीवनराम पवार यांनी मंदीर आवाराचा विस्तार केला. कृष्णाजी पाटील पवार यांनी पायर्‍या बांधुन दिल्या. मंदिरात महशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा, वैकुंठ चतुर्थी व श्रावण सोमवारी विविध पूजा‌अर्चा विधी व उत्सव साजरे केले जातात.

श्री काळाराम मंदिर

काळाराम मंदिर म्हणजे नाशिकमधील सर्वात महत्वाचे मानले जाणारे मंदिर. अतिशय सुंदर बांधणी, प्रशस्थ आवार, किर्तन, धार्मिक व्याख्यानं, भाषणं, इत्यादींसाठी छोटासा दगडी मोकळा सभामंडप, मंदिराच्या आतील चारही बाजुने सुमारे ८४ मोकळ्या ओवर्‍या. ही सोय खास भाविकांसाठी आहे. म्हणजे बाहेरगावाहून आलेले सर्वसाधारण भाविक यात्रेकरु या ओवर्‍यात विनामुल्य मुक्कामी राहू शकतात. या मंदिराची रचना पुर्णपणे दगडी व मजबुत आहे. चारही बाजूने सुरक्षित दगडी तटबंदी आहे. प्रवेशासाठी चार महाद्वार अर्थात पुर्व दिशेने आहे. या महद्वारात उभे राहिल्यावरसुध्दा मंदिरातील राम-सिता-लक्ष्मण यांच्या सुंदर, प्रसन्न मूर्त्यांचे दर्शन हो‌ऊ शकते. मूर्त्यांची प्रतिष्ठापना एका छोटेखानी सिंहसनावर केली आहे. मूर्त्यांना कलात्मक अलंकाराने नटवले असून मुकुटही आहे. मूर्त्यांच्या मागे व आजुबाजुस प्रभावळ आहे. याच मुर्त्यांच्या समोर असलेल्या सभामंडपात रामभक्‍त हनुमानाची मुर्ती आहे. हनुमानाचे मुख अर्थातच श्रीरामांकडे आहे. या मंदिराचे बांधकामास बारा वर्षे लागली. (१७८२ ते १७९४) पेशवे काळातील सरदार खंडेराव त्र्यंबक व रंगराव ओढेकर यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम करण्यात आले. मंदिराची उंची ७० फ़ूट आहे.

सीतागुंफ़ा

सीतागुंफ़ा म्हणजे वनवास काळातील सीतेचे राहण्याचे स्थान होय. सीतागुंफ़ेत प्रवेशासाठी कोणतेही शुल्क वा तिकिट नाही. उजव्या बाजुने अरुंद व उतरता प्रवेशमार्ग आहे व डाव्या बाजूने तसाच अरुंद पण बाहेर येण्याचा मार्ग आहे. खाली उतरल्यावर गुंफ़ेत राम-सिता-लक्ष्मण यांच्या सुंदर मुर्त्या आहेत. दुसर्‍या बाजुस सुंदर शिवलिंग आहे. दर्शन घे‌ऊन इच्छा असल्यास पूजादेखील करता येते. तपोवन : रामायण काळातील दंडकारण्याचा एक भाग म्हणजे हल्लीचे तपोवन होय. राक्षसी शूर्पणखेचे नाक (नासिका) लक्ष्मणाने कापले व त्यावरुन या शहराचे नाव "नाशिक" पडले. त्या लक्षमणाने जुने मंदिर व नवीनही मंदिर तपोवनातच आहे. २००४ मधील सिंहस्थ काळात तपोवनात रस्ते व इतर सुधारणा करण्यात आले आहेत. तपोवनात अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी पाचमुखी हनुमान बालाजी मंदिर, कृष्णतीर्थाश्रम, स्वामी जनार्दन मठ, नर्मदेश्वरी आश्रम, गोपाळ मंदिर, इत्यादी प्रमुख आहेत. सात तीर्थे व शूर्पणखा तीर्थही आहे. मंदिरांबरोबरच गोदावरी नदीच्या प्रवाहाच्या आजूबाजूस छोटा पूल व फ़रसबंद मोकळी जागा आहे. झाडी झुडपाने येथील वातावरण खूपच छान व शांततापुर्ण वाटते.

कार्तिकस्वामी मंदिर

काळाराम मंदिराच्या अलीकडे आहे. कार्तिकस्वामींची मुर्ती पूर्णाकृती, उभी, मुकुटधारी, वस्त्रालंकारयुक्‍त असुन कार्तिक पौर्णिमेस यात्रा भरते व या दिवशी स्त्रिया दर्शन लाभ घे‌ऊ शकतात.

नारोशंकर मंदिर

सीतागुंफ़ा-काळाराम मंदिराकडून परततांना सरदार चौकाकडे जाणार्‍या गल्लीने खाली उतरल्यावर व रामसेतू पुलाच्या एका कोपर्‍यात हे जुने आणि चांगले मंदिर आहे. पेशवे काळातील एक सरदार नारोशंकर यांच्या स्मरणार्थ हे नाव दिले गेले. या मंदिराची शिल्परचना व कलाकुसर नेहमी वाखाणली जाते. याही मंदिरास तीन बाजुने तटबंदी आहे. पण आवार नसल्याने मंदिर तसे लहान वाटते. चार बाजूला घुमट आहे. ते किल्ल्यावरील लहान बुरुजासारखे वाटतात. मंदिराच्या दर्शनी प्रवेशद्वारावर मोठी घंटा टांगलेली आहे. ही घंटा विजयाचे प्रतीक म्हणुन सरदार नारोशंकरांनी वस‌ईच्या चर्चमधून आणली. घंटेवर इ.स.१७२१ असे कोरलेले आहे. भारतीय शिल्पकतेली इतिहासात या मंदिराच्या शिल्पाकृतींना महत्व आहे.

सुंदरनारायण मंदिर

हे मंदिर अहिल्यादेवी होळकर पुलाच्या कडेला व गोदावरी नदीपत्राजवळच आहे. या पुलाचे जुने नाव व्हिक्टोरिया पुल होते. कपालेश्वर जसे शंकराचे मंदिर तसेच सुंदरनारायण मंदिर हे विष्णुचे. या मंदिराची बांधणी इ.स.१७५६ मध्ये गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी केली. मंदिरात श्रीविष्णूची उर्फ़ सुंदरनारायणाची मूर्ती मुख्य आहे व डावी-उजवीकडे लक्ष्मी व सरस्वती देवींच्या मुर्त्या आहेत. नारोशंकराप्रमाणेच या मंदिरावरील कोरीव कलाकुसर आकर्षक आहे. प्रवेशद्वार, लहान मंडप, मोठा मंडप आणि छोट्या-छोट्या दगडी कंगोर्‍यांचा घुमट अशी रचना आहे. २१ मार्च रोजी सूर्योदय होताच पहिली सूर्यकिरणे सरळ मूर्तीवरच पडावीत अशी रचना केली आहे. सुंदरनारायण नावामागे पौराणिक कथा आहे. जालंदर राक्षसाचा नाश करण्यासाठी श्रीविष्णुने जालंदरचेच काळे रुप घ्यावे लागले. सती वृंदेने त्याला शाप दिला होता. गोदावरीत स्नान केल्यानंतर शापाचे सामर्थ्य संपले व श्रीविष्णूस पुर्वीचे सुंदर रुप प्राप्त झाले म्हणून तो सुंदरनारायण होय.

भक्‍तीधाम

आहिल्यादेवी होळकर पूल संपताच, मालेगांव स्टँड चौकातुन डावीकडे जाणार्‍या रस्त्याने पुढील चौकात आल्यावर उजवीकडे वळणदार रस्त्याने मुख्य सिग्नल चौकात यावे. त्याच चौकात डावीकडे लगेचच हे जुने भक्‍तीधाम मंदिर आहे. मंदिरात श्री पशुपतिनाथाची (श्री शंकराची) मूर्ती मुख्य आहे तर सभामंडपात नर-नारायण-विराट दर्शन, राम-सिता-लक्ष्मण यांच्या सुरेख मूर्त्या आहेत. मंदिराच्या आतील बाजूस बारा ज्योर्तिलिंगाचे दृश्य तयार केलेले आहे. पूर्वी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे वर प्राणांच्या सुंदर मूर्त्या होत्या. त्यात आता बदल करण्यात आला आहे. जुन्या दृश्यांऐवजी आता सप्तश्रृंगी देवी, गणेश मूर्ती व त्या दोघात सूर्याचा रथ असे छान दृश्य आहे. मंदिरास लागून कैलास मठ आहे. येथे वेद विद्यालयही चालवले जाते.

गुरुगंगेश्वर वेद मंदिर

भक्‍तीधामामध्ये वेदांच्या अभ्यासासाठी सुविधा आहे पण गुरुगंगेश्वर वेद मंदिरात वेदांनाच मुर्ती विषय बनवले आहे. वेदग्रंथाचीच येथे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हे गुरुगंगेश्वर वेद मंदिर नाशिक शहरात, मध्यवर्ती ठीकाणी म्हणजे नवीन बसस्थानकापासून, त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या रस्त्यावरच फ़क्‍त अर्धा कि.मी. अंतरावर आहे. भौमितीक रचनेनुसार प्रवेशद्वार अर्धचंद्राकृती असून दोन्ही बाजुस व मध्यभागी पण जरा मागील अंतरावर गोपुरांसारखी पण फ़क्‍त उंचीच्या संदर्भात शिखरासह रचना आहे. शिवाय हे शिखर नेहमीच्या मंदिरांसारखे व कळसयुक्‍त स्वरुपाचे नाही. संगमरवराचा वापरही अनोखा आहे. इटालियन मार्बल व जेरुसलेम येथील पिवळसर रंगाच्या संगमरवराचा वापर मंदिर बांधणीसाठी केला आहे. आतमध्ये छताला बिलोरी काचेची झुंबरं आहेत व त्यात छोटे बल्ब बसवुन झगमगाट जाणवेल अशी कारागिरी केली आहे.

मुक्‍तीधाम

मुक्‍तीधामचं मंदिर हे आधुनिक काळातील असून, संपुर्ण मंदिर बांधणीसाठी राजस्थानातील मक्राना जातीच्या व संपुर्ण शुभ्र्च संगमरवरी टा‌ईल्स वापरल्या आहेत. त्यामुळेच मंदिराची पवित्रता मनावर ठसते. मंदिरात राम-सिता-लक्ष्मण, राधा-कृष्ण, लक्ष्मी-नारायण यांच्या सुबक-सुंदर मुर्त्या आहेत. हे मंदिर म्हणजे सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असल्याने, भारतातील महत्वाच्या संत-विभुतींच्या मूर्त्या येथे क्रमशः स्थापन केल्या आहेत. त्यात शेगावचे संत गजानन महाराज, शिर्डीचे सा‌ईबाबा, पंढरपुरचे विठ्ठल-रखुमा‌ई, द्वारकेचा द्वारकाधीश, महालक्ष्मी, सिध्दिविनायक, दुर्गादेवी, सरस्वतीदेवी, श्रीगुरुदत्त, गायत्रीदेवी, जलारामबाबा, भक्‍त नरसी मेहता, संत जनाबा‌ई, डाकोरचे रणछोडजी, तिरुपती बालाजी, संत गुरुनानक यांचा समावेश आहे. या मूर्त्या क्रमाने बघतांना आपो‌आपच मंदिरातून एक परिक्रमा पूर्ण होते. अगदि शेवटी बद्रीनाथ धाम, बारा ज्योर्तिलिंगे व गंगावतरणाचे सुंदर दृश्यही कायमस्वरुपी तयार करुन ठेवले आहे. सभामंडपात भिंतीवर गीतेचा संपूर्ण १८वा अध्याय लिहिलेला आहे. शिवाय श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगत असल्याचे छान रेखाटनही आहे.

टाकळी मठ

टाकळी मठ हे रुढार्थाने मंदिर स्वरुपाचे नाही. महाराष्ट्रातील एक संप्रदायी रामदास स्वामी यांनी स्थापन केलेला पहिला मठ म्हणून हा महत्वाचा मानला जातो. योगायोगाचा भाग असा कि, श्रीरामांना १४ वर्षे वनवासासाठी नाशिकमध्ये वास्तव्य करावे लागले होते. त्याच श्रीरामांच्या भक्‍तीसाठी रामदास १२ वर्षे नाशिकच्या गोदावरीकाठी मुक्कामी राहिले. रामदास स्वामी खुप साधेपणाने राहत असत. त्यामुळे या मंदिरांच्या परिसरात साधेपणा जपलेला आढळतो. त्यांनी स्थापन केलेला हा पहिलाच मारुती होय. त्यांच्या पादुका व कुबडी येथे पहावयास मिळतात. दासनवमी, रामनवमी आणि हनुमान जयंती हे उत्सव येथे एखाद्या यात्रेसारखे साजरे केले जातात. त्यासाठी मोठी सभागृहे आहेत. परिसराचे सुशोभीकरण करतांना गोदावरी नदीकाठी, मठाजवळ लांबलचक घाटही बांधण्यात आला आहे. एक शांत व वेगळे स्थान म्हणून पर्यटक येथे भेट देत असतात.

सोमेश्वर मंदिर

नाशिककरांना मोहात पाडणारे व आवडता पिकनिक स्पॉट समजले जाणारे निसर्गरम्य स्थळ म्हणजे सोमेश्वर मंदिराचा हिरवागार परिसर होय. गोदावरी नदिकाठीच असल्याने या स्थानाला वेगळेच परिणाम लाभले आहे. चार मंदिरांपैकी सोमेश्वर मंदिर प्रमुख आहे व राम-सिता-लक्ष्मण, श्री विष्णु-लक्ष्मी आणि रामभक्‍त हनुमानाचे अशी इतर अशी तीन मंदिरे आहेत. सोमेश्वर मंदिराच्या पुढे डावीकडून एक पायवाट नदिपात्राकडे जाते. येथे स्नानाचा आनंद घेता येतो. आणखी पुढे गेल्यावर २५-३० फ़ूटांवरुन कोसळणारा धबधबा दिसतो. त्याच्या फ़ेसाळत्या शुभ्र पाण्यामुळे त्यास "दुधसागर धबधबा" म्हणतात. विशेषतः पावसाळ्यात या धबधब्याचे खरे सौंदर्य पाहण्यासारखेच असते.

चामराज लेणी

लेणी म्हटली की डोळ्या समोर अजिंठा-वेरुळ्सारखी लेणी येतात, पण सर्वच ठिकाणी तशी अपेक्षा करणे योग्य नसते. लेणी म्हणजे डोंगरातील छोट्या गुंफ़ा असाही अर्थ घ्यावा लागतो. चामराज लेणीसुध्दा याच प्रकारच्या आहेत. नाशिक शहरापासुन सुमारे ८ कि.मी. अंतरावरील एका छोट्या पर्वतावर या लेण्या आहेत. त्यासाठी पेठ रोडने पुढे जावे लागते व नंतर "बोरगड" चा रस्ता लेण्यांकडे नेतो. एक गोष्ट चांगली आहे की लेण्यांपर्यत जाण्यासाठी चांगल्या दगडी पायर्‍या आहेत. ही लेणी जैनांची असल्याने आदिनाथांची काळ्या पाषाणाची मुर्ती मुख्य आहे व इतर दोन लेण्यात जैनधर्मातील वेगवेगळी दृश्ये मूर्तीरुपात मांडली आहेत. ११ व्या शतकातील या लेण्यांना गजपंथी लेणी असेही म्हणतात. या टेकडीवरुन नाशिक शहराचे सुंदर दृश्य दिसते. लेण्यांकडे जाण्यापूर्वीच टेकडीच्या पायथ्याशी पार्श्वनाथा जैन मंदिर आहे. वाटल्यास ते आधी पाहून मग लेण्यांकडे जावे.

अक्षरधाम मंदिर

पुर्वी या मंदिरास ब्रम्हचारी आश्रम नाव होते. तपोवनाकडे जाणार्‍या रस्त्याच्या अलीकडे औरंगाबाद हायवेला लागून हे मंदिर आहे. मंदिरात राधा-कृष्ण, लक्ष्मी-नारायण व रनछोडदास विक्रम यांच्या मुर्त्या आहेत.

कोदंडधारी राम मंदिर

देशात अशा प्रकारची हि एकमेव मुर्ती असल्याचे सांगितले जाते, कारण फ़क्‍त रामाचीच मुर्ती स्थापन करु नये असा दंडक आहे. वैशिष्ट्य असे कि, येथील भोसला मिलिटरी स्कुलमध्ये प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थींनी उडविलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या धातुतून ही मुर्ती बनवली असल्याने तिची चकाकी कायम असते व मुर्तीवरही रासायनिक प्रक्रिया वा इतर परिणाम होत नाही. मूर्तीतून रामाचे लोभसवाणे पण कणखर व्यक्‍तिमत्व साकार होते. रामाच्या डाव्या हातात धनुष्य, उजव्या हातात बाण व डोक्यावर मुकुट असून प्रत्यंचा सरळ रेषेत ताण दिल्यासारखी बरोबर वाटते.

शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर

देवळाली येथे शांतिनाथांची, भारतातील एकमेव ५१ इंची, पद्‍मासनी, पंचधातुची मूर्ती, त्याखेरीज ५ फ़ुटी, खड्‍गासनी श्री आठ बलभद्राजींची मूर्ती, इंद्रसभा, राजसभा, जन्मकल्याण, शोभायात्रा, इत्यादी सुशोभित दालने. पैकी इंद्रसभेतील काचकाम सुंदर व आकर्षण आहे.

खंडोबा मंदिर

देवळाली कॅम्प विभागात असुन. पार्किंगची सुविधा आहे. पायथ्याशीच सुंदर हिरवेगार उद्यान. तेथुन १०० पायर्‍या चढुन टेकडीवर जावे लागते. टेकडीवर डोंगरातील यांत्रिक धबधबा, सूर्यादय-सुर्यास्ताचे कृत्रिम दृश्य छान वाटते. येथेच खंडोबाचे जुळे मंदिर असून दोन्ही घुमटाकृती छताचे आहेत. खंडोबाची मोठी मुर्ती व बाणा‌ई-म्हाळसाची मूर्ती आहे. नंदि मूर्तीही आहे. मंदिराची गोलाकार रचना वेगळी वाटते. टेकडीतून देवळातीचा परिसर, लष्करी रस्ते, थर्मल पॉवर स्टेशन, इत्यादी दिसते.

रेणुकादेवी मंदिर

(नाशिकपासुन ४० कि.मी.) चांदवड गावी. चांदवडचे जुने नाव "चंद्रादित्यपुर" घाटचढणीच्या अगदी सुरुवातीलाच व रस्त्याच्या पलीकडिल विस्तृत आवारात, प्राचीन काळापासून प्रसिध्द. अहिल्याबा‌ई होळकरांनी इ.स.१७४० मध्ये या मंदिराचा जीर्णोध्दार करुन नेटके रुप दिले. मंदिरासमोर दोन दीपमाळा, प्रशस्त आवार. देवी मूर्ती तांदळा प्रकारातील. डोळे चांदीचे व नथ मोत्याची, मुखवटा २ किलो सोन्याचा. देवी पालखी दसर्‍यास खंडेराव मंदिरात नेली जाते व मुखवटा ठेवून, सुवासिनींकडून पुजा झाल्यावर, रंगमहाल ते देवी मंदिर अशा मिरवणुकिने आणला जातो. घाट, डोंगर, शेती व जवळच गाव असे वातावरण छानच वाटते.

त्र्यंबकेश्वर मंदिर

त्र्यंबकेश्वर मंदिर म्हणजेच श्री शंकराचे प्राचीन ज्योर्तिलिंग होय. येथे गाभार्‍याची मुर्तीचे रचना मात्र वेगळी आहे. गाभार्‍यात वाळुची पाषाणशालुंका असून तिच्याभोवती खोलगट भाग आहे. हे प्रमुख शिवलिंग होय. या शाळुंकेवरील तीन खोलगट खाचा म्हणजे ब्रम्हा-विष्णू-महेश यांची प्रतीके व त्यावरील प्रत्येकी एकेक खाच म्हणजे गंगा-गोदावरी-सरस्वती नद्यांची प्रतीके समजली जातात. मंदिराची रचना बरीचशी काळाराम मंदिरासारखी वाटते. चारही बाजूने तटबंदी, तटबंदिला चार दरवाजे, प्रशस्त आवार, आवारात मुख्य मंदिर व मंदिराला तीन प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या मागे, कोपर्‍यात अमृतकुंड तर पुढे गोपुर, दगडी दीपमाळ व नंदिची छान मुर्ती, तेही छोटेसे मंदिरच आहे. नंदिला नमस्कार करुन मग मंदिरात प्रवेश करण्याची प्रथा आहे. मंदिरावर पायापासुन छतापर्यंत कलाकुसरीचे कोरीव काम केले आहे. तर सभामंडपात अष्टभैरव व इतर मुर्त्या आहेत. त्र्यंबकेश्वर गाव समुद्रसपाटीपासुन सव्वाचार हजार फ़ुट उंचीवर असल्याने येथील हवामान साधारणतः थंड स्वरुपाचे असते. हे मंदिर बांधण्यासाठी तीस वर्षे लागली. त्याचे प्रतीक म्हणून मंदिराच्या उजवीकडे तीन देवळ्या आहेत. मंदिर बांधणीबाबतचा एक शिलालेख येथे पहावयास मिळतो. मंदिराची बांधणी पेशवे काळात झाली आहे. पेशव्यांनीच त्र्यंबकेश्चर देवासाठी सोन्याचा मुकुट चढवला आहे. महाशिवरात्री मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.

कुशावर्त तीर्थ

रामकुंडा‌इतकेच महत्व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थास आहे. या कुशावर्तात आधी स्नान करुन मग त्र्यंबकेश्चर मंदिरात दर्शनार्थ जाण्याची परंपरा भाविक पाळतात. कुशावर्तात खाली जिवंत पाण्याचे झरे आहेत व गोदावरीच्या उगमस्थानापासुन नंतरच्या नदीप्रवाह कुशावर्तात ये‌ऊन पुढे वळण घेतो. कुशावर्त परिसरातही काही छोटी मंदिरे आहेत. या तीर्थकुंडाच बांधकाम इ.स. १७५० मध्ये झाले आहे. आत उतरण्यासाठी १५ दगडी पायर्‍या व त्या चारही बाजूने आहेत. अलीकडे येथे संरक्षणात्मक जाळी लावली आहे. गौतम ऋषींनी प्राचीन काळी येथेच गंगेला अडवले होते व तीर्थात पुण्यस्नान केले होते अशी पौराणिक कथा आहे.

गंगाद्वार मंदिर

गंगाद्वार मंदिर म्हणजे गोदावरी नदिच्या उगमस्थानाचा दुसरा टप्पा होय. हे मंदिर ब्रम्हगिरी किल्ल्याकडे जाणार्‍या रस्त्यावर साधारणतः निम्म्या पायर्‍या (३५०) चढुन गेल्यावर लागते. येथे पर्यटकांसाठी डोलीचीही सुविधा असते. मंदिराच्या पुढे छोटेसे पटांगण आहे. मंदिरात गोदावरी नदिचे देवीमुर्ती स्वरुप आहे. गोदावरी नदीप्रवाहाचे ठिबकणे येथे दिसते व याच मंदिराच्यावर गोदावरीचे उगमस्थानाचे कुंड आहे. तिकडे जाण्यासाठी वेगळा रस्ता व पायवाटा आहेत.

ब्रम्हगिरी किल्ला

गोदावरी नदीचे मुळ उगमस्थान जेथे आहे तो ब्रम्हगिरी किल्ला होय. शिवाप्रमाणेच हे स्थान ब्रम्हदेवाचेही आहे म्हणुन ब्रम्हगिरी नाव पडले. येथपर्यंत येण्यासाठी दगडी ओबडधोबड वळणाच्या पायवाटांनी यावे लागते. पठारावर मोकळी जागा आहे. किल्ल्याचे काही अवशेष आढळतात. एक चौकोनी कुंड दिसते. ते मूळ गंगा उगमस्थान होय व जवळच छोटे कुशावर्त, कोटीतीर्थ आहे. ब्रम्हगिरीचा प्रदक्षिणा मार्ग २०-२२ कि.मी. आहे. या किल्ल्यावरुन त्र्यंबकेश्वर गावाचे छान दृश्य दिसते. पावसाळ्यात संपुर्ण परिसर खूपच रमणीय दिसतो.

संत निवृत्तिनाथ मंदिर

त्र्यंबकेश्वर गावातच हे मंदिर रथ घराजवळ आहे. येथे संत निवृत्तिनाथ समाधी घेतली होती. वारकर्‍यांचे हे श्रध्दास्थान असून येथुन पंढरपुरला आषाढी एकादशीसाठी निवृत्तिनाथांची पालखी नेली जाते. संत निवृत्तिनाथ यात्रा उत्सवही मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ही यात्रा पौष वद्य ११ ला भरते.

सप्तश्रृंगीदेवी मंदिर व गड (वणी)

सप्तश्रृंगी देवस्थान नाशिकपासुन ५५ कि.मी. वर आहे. नाशिक-वणी-नांदुरी असा मार्ग. नांदुरी हे खेडेगाव. येथेच उतरावे. या गावासमोर्च सप्तश्रृंगी गड दिसतो व यात्रेकरुंच्या गर्दिमुळे ते लक्षातही येते. नांदुरी गाव पायथा ते सप्तश्रृंगी गडपठार हे अंतर ११ कि.मी. आहे. गडपठारापर्यंत डांबरी रस्ता आहे. सर्व लहान वाहने थेट पठारापर्यंत नेता येतात. देवीची मुर्ती डोंगरातील खडकात असुन तिचा दर्शनी भागच मूर्तीरुप आहे. देवीमुर्ती भव्य आहे. तिच्या अठरा हातात शस्त्रे व पायाखाली तिने महिषासुर राक्षसाला दाबुन धरले आहे. मुर्ती तेजस्वी व प्रभावी वाटते. गडपठारावर शिवालयातीर्थ, शीतकडा किंवा सतीकडा, जुने महादेव मंदिर आहे. नवरात्रात १५ दिवस येथे मोठी यात्रा भरते व वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सादर केले जातात.

शिर्डी संस्थान

शिर्डी येथील सा‌ईबाबांची संगमरवरी, तेजस्वी, लक्षवेधी मूर्ती भाविकांचे श्रध्दास्थान आहे. याच जाणिवेतून "शिर्डी संस्थानाची" सुरुवात करण्यात आली. ह्यातुनच सामाजिक उपक्रम, भाविकांना सुखसो‌ई व आधुनिक सुविधा देण्यात येतात. भारताच्या सर्व प्रांतातून, कानाकोरर्‍यातून सर्व तर्‍हेने, धर्माचे लोक बाबाच्या दर्शनास येतात.

पांडव लेणी

नाशिकच्या पांडव लेणीही प्रसिध्द आहेत. नाशिक नवीन बसस्थानकापासुन ५ व महामार्ग बसस्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. ही लेणी मात्र प्राचीन आहेत. सुमारे २५०० वर्षापूर्वींची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २००० वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या, पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा, कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या सर्व लेण्यात आहेत. मूर्त्यांची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे.

दादासाहेब फाळखे स्मारक

हिंदी सिनेमासृष्टीत दादासाहेव फाळके पारितोषिक हा उच्च सन्मान समजला जातो. दादासाहेब फाळकेंनीच सिनेमासृष्टीची मुहूर्तमेढ रोवली ती नाशिकमध्येच. त्यांच्या कार्य स्मरणार्थ फाळके स्मारक उभारले गेले आहे. पांडव लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या विस्तीर्ण परिसरात फाळके स्मारक, पुराणवस्तू संग्रहालय, बौध्द स्मारक, वॉटर पार्क या वास्तु एकवटल्या आहेत. दादासाहेब फाळकेंशी संबंधित चित्रपटसृष्टीचा इतिहास, प्रमुख घटना फोटोग्राफस व टिपणांच्या सहाय्याने येथे सुबकपणे मांडल्या आहेत. त्यातुन फाळकेंचे कष्टमय जीवनही उलगडते. दुसर्‍या एका दालनात चांगले पुराणवस्तू संग्रहालय आहे. हे संग्रहालय आधी नाशिक शहरातच होते. इ.स.२००१ मध्ये येथे स्थलांतरीत केले गेले. मराठा-मोगल काळातील लढा‌ईची हत्यारे, जुनी दुर्मिळ छायाचित्रे, जुने शिलालेख, काही मूर्त्या, छोट्या-मोठ्या सुमारे १००० मुर्त्या तरी येथे आहेत. हे संग्रहालय म्हणजे भूतकाळात एक फेरफटका मारण्याचे साधन होय. येथील उद्यान व वॉटर पार्क मनोरंजनासाठी प्रसिध्द आहेत.

अनोखे वस्तूसंग्रहालय

(टिळक पथ, सार्वजनिक वाचनालय, तळमजल्यावर) इ.स. १८४० मध्ये "नेटिव्ह लायबरी" व स्वातंत्र्यानंतर "सार्वजनिक वाचनालय" असे नामांतर झालेल्या या वाचनालयाच्या वतीने वस्तूसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. एकुण १२-१५ विभागात मिळून ताम्रपट, शिलालेख, लेखन साहित्य, २०० वर्षे जुनी उत्तम दुर्मिळ काचचित्रे, २६ पाषाण व काष्ठशिल्पे, यात ११ व्या शतकातील सुरसुंदरीची पाषाणमूर्ती, श्री गणेशाची बैठी मूर्ती, दुर्गा, पंचमुखी शिवलींग इत्यादींचा समावेश आहे.

कल्पवृक्ष ज्ञानसंग्रहालय

(अंबड औद्योगिक वसाहत, ताज हॉटेलमागे, मुंब‌ई-आग्रा हायवेवर) शालेय सहलींसाठी योग्या स्थान, संग्रहालयात पृथ्वी-तारांगण-आकाश असे तीन विभाग असुन पृथ्वीच्या साडेचार मीटर गोलावरुन आंतरराष्ट्रीय सीमा, प्रमाण वेळ, इत्यादी दाखल्यावर आहेत. भारतीय हवा‌ई दलातील १८ विमानांच्या प्रतिकृती, विमानवाहु युध्दनौकेच्या ए‌अरबसची व अवकासस्थानाची प्रतिकृती, विविध पोस्टर्सद्वारा बो‌ईंग विमानाच्या कारखान्याची भव्य इमारत, स्वातंत्र्यदेवीचा पुतळा, आयफेल टॉवर, जगातला सर्वात मोठा पूल, पहिले प्रवासी विमान सुपर सॉनिक जेट, इत्यादि माहिती समजून घेता येते. वैमानिक कलेचा इतिहास, भारताचे रामायण काळापासुनचे नकाशे, इत्यादी, भुकंपीय व्यासपीठावर बसल्यावर भूकंपाचे धक्के कसे बसतात ते अनुभवता येते. काळोख किती काळा असतो, पृथ्वीच्या पोटात काय दडलंय, अंतराळ स्थानक म्हणजे काय याची नेमकी माहिती मिळते.

नाणी संग्रहालय

नाशिक शहरापासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर प्राचीन अंजनेरी किल्ल्याचा, भव्य मारुती मूर्ती असलेल्या मंदिराचा निसर्गरम्य परिसर आहे. याच परिसरात हे नाणी संग्रहालय आहे. याची स्थापना इ.स. १९८० मध्ये झाली आहे. भारतीय नाणीयुगची आतापर्यंतची वाटचाल व इतिहास या नाणी संग्रहालयाद्वारा पहायला मिळते. वेगवेगळे तक्ते, जुनी दुर्मिळ नाणी, खोटी नाणी, टांकसाळीची प्रतिकृती नाणेशास्त्रविषयक पुस्तकांची व तक्त्यांची भव्य लायब्ररी असे या संग्रहालयाचे स्वरुप आहे. त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावरचा संग्रहालय असल्याने अनेक पर्यटक नाणी संग्रहालयास आवर्जुन भेट देतात.

नांदुरमध्यमेश्वर पक्षी निरीक्षण केंद्र

(नाशिकपासुन ४० कि.मी.) निफाड तालुक्यात. महाराष्ट्राचे मिनी भरतपुर समजले जाणारे पक्षी निरीक्षण केंद्र. निरीक्षण काळ नोव्हेंबर ते फेब्रुवारी. नांदुरमध्यमेश्वर येथील जलाशय पाणथळीचा असल्याने स्थलांतरीत पक्ष्यांना भरपुर खाद्य मिळते व सुरक्षितताही लाभते. सुमारे दोनशे जातीचे हजारो पक्षी युरोप, आफ्रिकेचा उत्तर परगाणा, मध्य आशिया तसेच आपल्या हिमालय, लडाख भागातून येतात.

चंदनपूरी

मालेगांव तालुक्यातील चंदनपुरी हे खंडोबाचं देवस्थान म्हणून प्रसिध्द आहे. खंडोबाची दुसरी पत्‍नी बाणा‌ईचे या ठिकाणी काही काळ वास्तव्य होते. चंदनपूरीला खंडोबा काही वर्षे गुराखी म्हणून राहिले होते. त्यानंतर दोघे जेजुरीला गेले अशी आख्यायिका आहे. चंदनपूरीला जानेवारी महिन्यात मोठी यात्रा भरते. तेथे प्रचंड संख्येने भाविकांची उपस्थिती असते.

गारगोटी संग्रहालय

(सिन्नर एम‌आयडीसीत) आशिया खंडातील एकमेव, अनुपम व सुंदर, विविध आकार-प्रकार-रंगाचे-ढंगाचे सौंदर्यपुर्ण अशा असंख्य गारगोट्या एकाच वेळी पहावयास मिळतात. प्रवेश केल्यानंतर भारतमातेचे सुंदर शिल्प दिसते. पृथ्वीगोलावर ती उभी असुन ती चार हातांची आहे. हातात त्रिशुल, कमळ, कणीस व आशिर्वाद देणारा हात. मूर्तीमागेच बलिष्ठ सिंह मूर्तीही. सदर शिल्प फायबरमध्ये घडवलेले आहे. मूर्ती उंची साडेसात फूट. भारतमातेच्या वरील बाजुस जगाचा सुंदर नकाशा, रंगीत शंख-शिंपले, इत्यादी आकर्षक आहेत. काही गारगोटी-शिल्पे विकत मिळण्याचीही सोय आहे.

सापुतारा

(नाशिकपासुन ९० कि.मी.) महाराष्ट्र-गुजरात सीमारेषेवरील थंड हवेचे ठिकाण, पर्यटकांसाठी तंबू निवास, सर्किट हा‌ऊस, वन विभागाच्या लॉग हटस, जिल्हा परिषदेची निवास व्यवस्था. महाराष्ट्र एमटीडीसी वा गुजरात पर्यटन केंद्रातर्फे त्यांच्या ताब्यातील निवासी खोल्यांसाठी बुकींग करावे लागते. सर्पगंगा नदी किनारीचे हे स्थळ समुद्र सपाटीपासून १००० फूट उंचीवर. दाट झाडी, डोंगर, इत्यादींमुळे नितांत रम्य परिसर. सनसेट पॉ‌ईंट, वाघबारी, नागेश्वर महादेव मंदिर, अंबिका मंदिर, जलक्रीडा केंद्र व आदिवासी जीवनदर्शन घडवणारे वस्तूसंग्रहालय, पावसाळ्यात विशेषतः श्रावणात गेल्यास अधिक योग्य.

एच.ए.एल. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड)

देशाच्या हवा‌ई सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी संरक्षण खात्याच्या अखत्यरातील असलेला एच.ए.एल. (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड) हा कारखाना आग्रा रोडवरील ओझर ह्या गावी काढण्यात आला. ह्या गावास पूर्वी तांबटांचे ओझर म्हणून ओळखले जायचे आता त्याचे रुपांतर ओझर-मिग असे झालेले आहे. येथे मिग सिरीजची लढावू विमाने बनविली जातात. सुमारे दहा हजार कर्मचारी येथे काम करतात. विमान उत्पादनाव्यतिरिक्‍त कला.क्रिडा, नाट्य आणि लेख आदि क्षेत्रांत येथील कर्मचारी आघाडीवर आहेत. माजी संरक्षणमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्‍नाने हा कारखाना सन १९६३-६४ साली नाशिक येथे आणला गेला.

भारत प्रतिभुती मुद्रणालय, नाशिकरोड

 

नाशिकच्या औद्योगिक विकास पायाभरणीत नाशिकरोड येथील नोट प्रेसचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. येथील कोरडे हवामान, जवळच रेल्वे स्टेशन, पाणी पुरवठ्याची सोय, इत्यादी कारणांमुळे ब्रिटिशांनी स्वातंत्रपुर्व काळात म्हणजेच सन १९२८ साली करन्सी नोट प्रेस भारत प्रतिभुती मुद्रणालय यांची नाशिकरोड येथे स्थापना केली. येथे साधारणतः दहा हजार कामगार कार्यरत असून, चलनी नोटा छापल्या जातात. ह्यामुळे भारताच कुबेरच जणू येथेच मुक्कामाला आहे असेच वाटते. पोष्टाची तिकिटे, पाकिटे, आंतरदेशीय पत्रे, इत्यादी छपा‌ई देखील येथेच होते. गांधीनगर येथे देखील भारत सरकारचा मोठा प्रेस आहे. येथे साधारणतः सात-आठ हजार कामगार असून स्टॅम्प पेपर व अन्य पोस्टल सामग्री छापली जाते.

कांदा व्यापार व वा‌ईन प्रकल्प

 

आशिया खंडात कांदा खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ म्हणून लासलगाव प्रसिध्द आहे. शेतकर्‍यांच्या आर्थिक विकासात कांदा व्यवसायाने मोलाची भर घातलेली आहे. कांदा व्यवसाय आज भारताच्या अर्थकारणात महत्वाचे स्थान टिकवून आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील ओझर, पिंपळगाव बसवंत, निफाड परिसराट द्राक्षाचे विक्रमी उत्पादन होत असल्याने अनेक वा‌ईन प्रकल्प सुरु झाले आहेत व त्यालाही देश-विदेशातुन चांगली मागणी आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म भगुर येथे झाला. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी शस्त्र हातात धरण्याशिवाय पर्याय नाही. हे ठासून सांगणारे सावरकर नाशिकचे भूषण आहे. एकाच वेळी दोन जन्मठेपेची शिक्षा हसतमुखाने स्वीकारणारे क्रांतीसुर्य सावरकर स्वातंत्र्य योद्‍ध्यांची प्रेरणा होते. भगूर येथे सावरकरांचे स्मारक आहे. "ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला" ही मातृभूमीची हाक जपणारे स्वातंत्र्यवीर सावरकर इतिहासातील सुवर्णपान आहे.

हुतात्मा अनंत कान्हेरे

स्वातंत्र्य चळवळीत कलेक्टर जॅक्सनची विजयानंद थि‌एटरमध्ये हत्या करणारे हुतात्मा अनंत कान्हेरे नाशिकच्या क्रांतिकारकांच्या इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी आहेत. प्राणांची आहुती दे‌ऊन स्वातंत्र्याचा ध्वज फडकविण्यात हुतात्मा कान्हेरेंचा मोलाचा वाटा आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी मातृभुमीचे रक्षण करण्यासाठी नवा इतिहास निर्माण केला.

वि.वा.शिरवाडकर तथा कवि कुसुमाग्रज

ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवी व लेखक वि.वा.शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांनी नाशिकचे नाव जागतिक पातळीवर नेले. त्यांच्या "नटसम्राट" नाटकाने तर इतिहास घडवला. मानवतेचा संदेश देणार्‍या कुसुमाग्रजांच्या कविता रसिक वाचकांनी मनात जपुन ठेवल्या आहेत. शिरवादकरांजवळ निर्मत्सरी, निरहंकारी, निर्मळ आणि विशुध्द माणुसकी मानणारे प्रगल्भ मन होते. माणुसकी, प्रेम, सत्य, सौंदर्य, शिवम या चिरंतन मुल्यांशी त्यांची बांधिलकी होती. सत्कार समारंभ, गौरव आणि मानसन्मान यापासुन नेहमीच दूर राहणार्‍या शिरवाडकरांची स्मृती चिरंतन राहावी म्हणून नाशिक परिसरातील त्यांच्या सुह्रदांनी, चाहत्यांनी २६ मार्च १९९० रोजी "कुसुमाग्रज प्रतिष्ठान" ची स्थापना केली.

प्रा.वसंत कानेटकर

मराठी प्रायोगिक, समांतर, व्यावसायिक रंगभुमीवर आपल्या आशयप्रधान नाटकांनी स्वतंत्र ओळख निर्माण करणारे प्रा.वसंत कानेटकर रंगभुमीच्या इतिहासात वैविध्यपुर्ण नाटकांमुळे अजरामर ठरले आहेत. रायगडाला जेव्हा जाग येते, अश्रूंची झाली फुले, सुर्याची पिल्ले, वादळ माणसाळतय, लेकुरे उदंड जाहली, गगनभेदी, सोनचाफा, प्रेमाच्या गावा जावे अशा असंख्य नाटकांनी मराठी व्यावसायिक रंगभुमीला नवी झळाळी प्राप्त करुन दिली.

दादासाहेब फाळके

भारतीय चित्रपट उद्योगाचा पाया घालणारे चित्रमहर्षी दादासाहेब उर्फ धुंडीराज फाळके नाशिकचेच रहिवाशी होते. चित्रपट निर्मितीकरता प्रथम डायमंड पिक्चर्स कॉर्पोरेशन ही संस्था स्थापन करुन सन १९१३ साली भारतात प्रथम चित्रपट राजा हरिश्चंद्र दादासाहेब फाळके यांनी काढला. फाळकेंनी अनेक आशयप्रधान व तंत्राचे वेगळेपण असणार्‍या चित्रपटांची निर्मिती करुन चित्रपट क्षेत्राला नवीन दिशा दिली. शासनाच्या वतीने दिला जाणारा "फाळके पुरस्कार" त्यांच्या कार्याची महती सांगणाराच आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड

भारतभर भूमिहीनांच्या हक्कासाठी व्यापक पातळीवरील लोकलढ्याचे नेतृत्व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी केले. संयुक्‍त महाराष्ट्र चळवळ, वसतीगृहांची चळवळ, काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व दादासाहेबांनी केले. समाज लढ्यात योगदान देणारं त्यांच कार्य सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

बाबूराब बागूल

दलित कथेचा प्रारंभ बाबूराव बागूल यांच्या "जेव्हा मी जात चोरली होती" या कथासंग्रहापासून झाला. दलित साहित्याला बाबूराव बागूलांनी आत्मभान दिले. "मरण स्वस्त होत आहे", "सूड" हि दिर्घकथा या बागुलांच्या साहित्यकृती मराठी कथेच्या वाटचालीतील महत्वाचा टप्पा आहे. अघोरी, दलित साहित्य, आजचे क्रांती विज्ञान, आंबेडकर भारत या त्यांच्या पुस्तकांनी विद्रोहाचा एक वेगळा अविष्कार दाखविला आहे.

वामनदादा कर्डक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश आपल्या गीतांच्या माध्यमातून पोहचविणारे वामनदादा कर्डक संपुर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर मध्य प्रदेशात व कर्नाटकातही गाजले. त्यांनी तीन हजारापेक्षा अधिक गाणी लिहीली व समाजाच्या कानाकोपर्‍यात पोहचविली. "आम्ही तुफानातील दिवे" हे त्यांचे गीत कायम गाजत राहिले. "वाटचाल", "मोहोळ", "माझ्या जीवनाचं गाणं" ही त्यांची पुस्तके प्रसिध्द आहे. "सांगत्ये ऐका" व "पंचारती" या चित्रपटांसाठी त्यांनी गीते रचली. आपले समग्र जीवन परिवर्तनाच्या लढा‌ईत सैनिक शिलेदार म्हणून त्यांनी व्यतीत केले.

वाहन सुविधा

नाशिकमध्ये फेरफटका करण्यासाठी वाहनांची कुठलीही अडचण येत नाही. सर्व प्रेक्षणीय स्थळांपर्यंत जाण्यासाठी पंचवटी निमाणी बस स्टॅंण्ड, पंचवटि कारंजा बस स्टॉप, रविवार कारंजा बस स्टॉप, शालिमार चौक बस स्टॉप, अशोकस्तंभ बस स्टॉप, इत्यादी ठिकाणांहून भरपुर शहरी बसेस पहाटे पाच वाजेपासुन ते रात्री बारा वाजेपर्यंत चालू असतात. शिवाय शे‌अर रिक्षा ही प्रवाशांसाठी चांगली सोय आहे. या शे‌अर रिक्षा वरील सर्व रिक्षा स्टॅंडवरुन उपलब्ध असतात. एका दिवसात झटपट नाशिक फेरफटका करण्याची इच्छा असेल तर टॅक्सीजही मिळु शकतात. महामार्ग बसस्थानकाबाहेर टॅक्सी स्टॅंड आहे. ज्यांना सहकुटुंब पण आरामात एसी/नॉन एसी कारने नाशिकमध्ये फेरफटका करावयाचा असेल त्यांच्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सतर्फे टाटा सुमो, मारुती कार, मिनी बसेस, इंडिका कार उपलब्ध हो‌ऊ शकतात. अर्थात या ट्रॅव्हल्सबाबतची माहिती त्या त्या ट्रॅव्हल्स कंपनीकडेच मिळु शकेल.

खवैय्यांसाठी चवदार नाशिक

नाशिकची चटकदार मिसळ-पाव सुप्रसिध्द असून अनेक ठिकाणी मिळते. तसेच कोंडाजी चिवडा व मकाजी चिवडा, नाशिकची द्राक्षे प्रसिध्द आहेत. त्याचबरोबर मनुके, बेदाणे उत्तम प्रतीचे मिळतात. जुन्या नाशकात बुधा हलवा‌ईची जिलेबी सुप्रसिध्द आहे. तसेच मेनरोड, गंगाघाटावरील पांडे मिठा‌ई यांचेकडिल पेढे, बासुंदि, खुरचंदवाडी व गुलाबजाम उत्तम दर्जाचे मिळतात. तसचं नाशिक हे द्राक्षापासुन बनविण्यात येणार्‍या वा‌ईन उत्पादनात आशिया खंडात अग्रगण्य आहे. येथे गंगापुर धरणाजवळील सुला वा‌ईन व विंचुर येथील विन्सुरा वा‌ईन विशेष प्रसिध्द आहेत.

नाशिकला येतांना

०१) ओळखपत्र (पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट/निवडणूक ओळखपत्र) सर्व सदस्यांनी जवळ बाळगावीत. हॉटेल बुकिंगसाठी त्यापैकी एकाची प्रत (झेरॉक्स) देणे बंधनकारक आहे.
०२) नाशिक थंड हवेसाठी प्रसिध्द आहे. कृपया आवश्यक तेवढे उबदार कपडे जवळ बाळगावेत. नोव्हेंबरमधील तापमान १३ ते १५ डिग्री असेल.
०३) कुटुंबियांना आपण समवेत आणले असल्यास त्यांचेकडे हॉटेल, कार्यक्रमस्थळ तसेच सहाय्यक कक्षाचे दुरध्वनी क्रमांक यांची यादी देवून ठेवावी.
०४) स्वतःचे/ बॅंकेचे वाहन घे‌ऊन येत असल्यास गाडीची कागदपत्रे/पीयुसी/चालकांचे परवाना पत्र/वाहनाचे विमा (इन्शुरन्स) पत्र सोबत बाळगावेत.
०५) वाहन कार्यक्रमस्थळी पार्क करतांना वाहनाचा क्रमांक/चालकाचा मोबा‌ईल नंबर याची नोंद करावी.
०६) प्रत्येक सदस्याचे स्वतःजवळ आप‌आपले ओळखपत्र सोबत बाळगावे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडावा म्हणून जवळच्या नातलगांच्या किंवा मित्रांच्या नावासह दूरध्वनी असलेले कार्ड सोबत ठेवावे
०७) हॉटेलचे पॅकेज, अतिरिक्‍त कर तसेच जादा सेवांसाठी आकारण्यात येणारा जादा आकार याबद्दल हॉटेलमध्ये प्रवेश करतेवेळीच कृपया सर्व सविस्तर माहिती करुन घ्यावी.
०८) सर्वांनी कृपया आपले व्हिजिटींग कार्डस सोबत आणावीत.
०९) मौल्यवान वस्तू / रोख रक्कम/ मोबा‌ईल, ई. ची योग्य ती काळजी घ्यावी.

जीवनगंगा

अनुक्रमणिका

विभाग पहिला

०१ प्रस्तावना
०२ नगरसंस्थांचे तत्त्वज्ञान
०३ प्राचीन भारतीय स्थानिक स्वराज्य़ संस्था
०४ मुंबई इल्याख्यांतील नगरपालिकांचा इतिहास
०५ प्रथम कालखंड १८६४ ते १८७२
०६ नगरपालिकेची कामे
०७ सन्माननीय अध्यक्ष
०८ द्वितीय कालखंड १८७४ ते १९०१
०९ त्रुतिय कालखंड १९०२ ते १९२६
१० सन्माननीय उपाध्यक्ष
११ चतुर्थ कालखंड १९२६ ते १९४७
१२ पंचम कालखंड १९४८ ते १९५२
१३ षष्ठम कालखंड १९५२ ते १९६४
१४ नाशिक शहरातील लोकोपयोगी संस्था
१५ सन्माननीय विद्यमान सभापति व सभाप्रमुख
१६ सन्माननीय सभासद
१७ अमरधाम कमेटी
१८ सन्माननीय अधिकारी
१९ म्युनसिपल स्कुलबोर्ड
२० सन्माननीय विद्यमान सदस्य चरित्रात्मक टिपणे

विभाग दुसरा

०१ पुर्व परंपरा
०२ नाशिकमधील सामाजिक आंदोलने व संस्था जीवन
०३ स्वातंत्र्य संग्रामांतील कामगिरी
०४ साहित्य आणि नियतकालिकें
०५ कलोपासना
०६ आर्थिक औद्योगिक आणि व्यापारी वाटचाल
०७ शिक्षण आणि शिक्षण संस्था
०८ व्यायाम संस्था आणि बलोपासक

 

 
Last Updated
05-11-2014 11:51:37 Wednesday